सिल्लोडला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर उत्साहात

Foto
तीन दिवसीय मोफत लाठी काठीला प्रतिसाद

सिल्लोड, (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत आणि शिवस्वराज्य शिवकालीन युद्धकला मर्दानी आखाडा, सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मोफत लाठी काठी व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा २० सप्टेंबर रोजी शास्त्री नगर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात उत्साहात समारोप झाला. 

या शिबिरात महिला, विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तीन दिवसांच्या प्रशिक्षणादरम्यान सहभागी प्रशिक्षणार्थीना लाठी काठीसह स्वसंरक्षणाच्या विविध तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात आले. समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवकालीन लाठी काठी युद्धकलेचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. 

या शिबिराच्या आयोजनात शिवस्वराज्य शिवकालीन युद्धकला मर्दानी आखाड्याचे प्रमुख तथा प्रशिक्षक अनिकेत शंकर सोनुने यांनी विशेष मार्गदर्शन केले. सोनुने हे महाराष्ट्र राज्यस्तरीय मर्दानी युद्धकला स्पर्धांचे पंच तसेच मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 

शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षणाचा प्रसार करण्यासाठी सोनुने यांनी आतापर्यंत जवळपास ४,५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. योगेश रोडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अमृतवर्ग म्हणजे काय, त्याचे उद्दिष्ट आणि विद्यार्थ्यांसाठी त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्यविकास, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव वाढविण्यासाठी अमृतच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

लाठी काठी, तलवार, दांडपट्टा यांसारख्या पारंपरिक युद्धकलांसोबतच विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांच्यात आत्मविश्वास, शिस्त, धैर्य व प्रसंगावधान निर्माण करण्यावर त्यांचा भर आहे. विशेषतः मुली व महिलांसाठी विविध ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.



-- विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाची गरज --- 
आजच्या बदलत्या काळात विद्यार्थिनींनी शिक्षणासोबतच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. स्वसंरक्षणामुळे केवळ शारीरिक क्षमता वाढत नाही, तर आत्मविश्वास, धैर्य आणि प्रसंगावधानही विकसित होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनीने अशा प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.
- योगेश रोडे, जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत, छत्रपती संभाजीनगर